सोनाली (Sonali) PDF - महाराष्ट्र बोर्ड क्लास 10 कुमारभारती

Summary

हा दस्तऐवज महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी कुमारभारती पुस्तकातील ‘सोनाली’ (Sonali) नावाच्या पाठावर आधारित आहे, जो डॉ. वा. ग. पूर्णपात्रे यांनी लिहिला आहे. या पाठात, लेखकाने पाळीव प्राणी आणि मानवामधील संबंधाचे वर्णन केले आहे. सोनालीच्या माध्यमातून, लेखकाने माणसांनी प्राण्यांवर प्रेम केले पाहिजे, असा संदेश दिला आहे.

Full Transcript

१७. सोनाली डॉ. वा. ग. पूर्णपात्रे (जन्म-१९२० ते २००२) : प्रसिद्ध लेखक. त्यांचे वन्यप्राण्यांविषयीचे ‘सोनाली’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. प्राणीजगत्‌हा सर्वांच्याच कुतूहलाचा व जिव्हाळ्याचा विषय आहे. लहानपणापा...

१७. सोनाली डॉ. वा. ग. पूर्णपात्रे (जन्म-१९२० ते २००२) : प्रसिद्ध लेखक. त्यांचे वन्यप्राण्यांविषयीचे ‘सोनाली’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. प्राणीजगत्‌हा सर्वांच्याच कुतूहलाचा व जिव्हाळ्याचा विषय आहे. लहानपणापासून पाळीव प्राणी व जंगली प्राणी या दोघांबद्दलही आपल्याला आकर्षण असते. पाळीव प्राणी व हिंस्र प्राणी यामध्ये भेद आहेतच; परंतु जंगली प्राण्यांच्या हिंस्रपणाबाबत लहानपणापासून आपल्या मनात एक प्रकारची भीती व गैरसमज असताे. सोनाली हा पाठ सिंह या हिंस्र श्वापदामध्येही माणसावर प्रेम करण्याची वृत्ती असू शकते याचे सत्य उदाहरण आहे. हिंस्र श्वापदाला घरात पाळणे, नैसर्गिक वातावरणापासून त्याला दूर ठेवणे हे योग्य नाही; परंतु हिंस्र श्वापदातील पशुत्वावर प्रेमाने मात करता येऊ शकते. खरे म्हणजे मानवामध्ये सुद्धा प्रेम व संतापी वृत्ती अशा दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती आढळतात. आपल्यातील नकारात्मक प्रवृत्तींवरही मनुष्य मात करू शकतो याचाही हा वस्तुपाठ आहे. सोनाली हा सत्यकथेवर आधारित असलेला संवेदनशील पाठ माणसातील पशुत्व, वाईट प्रवृत्ती दूर व्हाव्यात, ही प्रेरणा देणारा आहे. माणसाने प्राण्यांवर प्रेम करावे असा संदेश या पाठातून मिळतो. ३१ मार्च १९७४, सोमवारचा दिवस. आमच्या साऱ्या घरात आज सुतकी वातावरण होतं. आमच्या लाडक्या सोनालीचा आज आमच्या घरातला शेवटचा दिवस. आज सोनाली पुण्याला जाणार होती. आपल्या कायमच्या घरी. तिथल्या पेशवे उद्यानात यापुढे तिचं कायम वास्तव्य राहणार होतं. आज मी स्वत: सोनालीला घेऊन पुण्याला निघालो होतो. गाडी पुढे चालली होती; पण मी मात्र मनानं भूतकाळात शिरलो होतो. अजून तो दिवस आठवतोय मला. २९ ऑगस्ट, १९७३. वेळ सायंकाळची. डॉ. चित्रे यांनी छोटासा पिंजरा तयार करूनच ठेवला होता. त्या तीन पिलांना त्यांनी मादीपासून दूर केलं आणि म्हणाले, ‘‘हो, डॉक्टर, सांगा तुमचा चॉइस.’’ तिन्ही बछड्यांना जन्मून दोन महिने झाले होते. मी तिन्ही पिल्लांना गोंजारलं; पण सगळीच फिसकन अंगावर आली. मी त्यातल्या त्यात कमी फिसकारणारं, थोड्या शांत स्वभावाचं एक पिल्लू निवडलं. ते इतरांपेक्षा थोडं सशक्तही होतं. बच्च्याला आम्ही पिंजऱ्यात ठेवलं. रात्रभर प्रवासात माझ्या मनात त्या छाव्याशिवाय दुसरा कशाचाच विचार नव्हता. दोन वर्षांचे झाले, की वाघ-सिंह पूर्ण ताकदीचे होतात. मग त्यांना शिकवणं, माणसाळवणं अवघड असतं. पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर नुसतं सर्कशीसारखं वन्य पशूंना ट्रेनिंग देणं हा हेतू नव्हता. मला एका जंगली जनावरावर प्रेम करायचं होतं. अगदी पोटच्या मुलासारखं. ती जेवल्याखेरीज मी जेवणार नव्हतो. तिला जवळ घेतल्याखेरीज मी झोपणार नव्हतो. आजपर्यंत पूर्णपात्रे घराण्यातील पराक्रमी लोकांनी शिकारी करून कीर्ती मिळवली होती; पण पशूमधील पशुत्वाची आज मी शिकार करायला निघालो होतो. आम्ही घरात प्रवेश केला. पहिला दिवस तसाच गेला. या सिंहकन्येचं आगमन होण्यापूर्वी पंधरा दिवस ‘रूपाली’चं आगमन झालं होतं. कापसासारखे शुभ्र पांढरे केस असलेली दीड महिन्यांची ही कुत्री आमच्या घरात सर्वांची लाडकी झाली होती. तिचे ते रुपेरी केस पाहून आम्ही तिचं नाव ‘रूपाली’ ठेवलं होतं. माझा मुलगा डॉ. सुभाष याला पहिली मुलगी झाली. घरात दीप आला, म्हणून आत्यानं, म्हणजेच सुचेतानं सुचवलेलं ‘दीपाली’ नाव ठेवलं. म्हणजे एकाच ऑगस्ट महिन्यात (१९७३) आमच्या संगम बंगल्यात ‘रूपाली’ आली, नात ‘दीपाली’ आली आणि आता सिंहकन्याही आली होती. असा हा मनोहर त्रिवेणी संगम इथं झाला होता. काय बरं या छाव्याचं नाव ठेवावं? सोन्यासारखे केस असलेली सुवर्णकांतीची ती मादी कोचावर बसली होती. तिच्या पाठीवरून हात फिरवताना एकदम मला नाव सुचलं- ‘सोनाली’. सुरुवातीला रूपालीचं आणि सोनालीचं मुळीच पटेना. रूपाली सोनालीवर भुंकायची आणि सोनालीही फिसकून अंगावर जायची. तीन चार दिवस हा प्रकार चालू होता; पण चार दिवसानंतर दोघींचीही गट्टी जमली. मग एकत्र बसणं, झोपणं सुरू झालं. हिंडताना रूपाली पुढे व सोनाली मागे. रूपाली सीनियर असल्यामुळे तो मान तिचाच होता. पुढे तर दोघींना एकमेकींचा इतका लळा लागला, की त्यांचं जेवणही एकत्र होऊ लागलं आणि रूपालीप्रमाणे सोनालीही माझ्याजवळ माझ्या पायथ्याशी झोपू लागली. 67 झोपायची वेळ झाली, की सोनाली उडी मारून बिछान्यात शिरे; पण चटकन झोपी जायचा तिचा स्वभावच नव्हता. बिछान्यात आली, की ती माझं तोंड चाटू लागे, मग केस चाटे. पंजानं माझे केस विस्कटून टाकी. कधी ती अन्‌रूपाली यांची दंगामस्ती माझ्याच बिछान्यात चालायची. दोघीही बिछान्यात चक्क नाचत, कुदत, थकल्या-दमल्या, की दोघीही आपापली जागा पकडून झोपायला येत. फुस्स करून रूपा अंग टाकी आणि झोपी जाई; पण सोनालीला मात्र अशी झोप येत नसे. लहान मुलासारखं तिला मला थोपटून झोपवावं लागे. तेव्हा कुठे बाईसाहेब झोपत. ती झोपे तीही एखाद्या लहान मुलासारखी अस्ताव्यस्त. झोपेत बाईसाहेब लोळतही भरपूर. शेवटी त्या दोघींच्या मध्ये मलाच झोपायला पुरेशी जागा मिळत नसे. सोनाली आणि रूपाली लहान होत्या तोपर्यंत रूपालीच अंगापिंडानं मोठी होती. वयानं तर ती सोनालीपेक्षा चांगली सात दिवसांनी मोठी. त्यामुळे ती सोनालीवर ताईगिरी करी. सोनालीवर गुरगुरे, तिला दमात घेई. सोनाली बिचारी गरीब. रूपाली तिच्यावर गुरगुरली, की बापडी कोपऱ्यात जाऊन निमूट बसे. पण दोघी वाढू लागल्या आणि सारं दृश्यच बदललं. रूपाली लहानखुरी राहिली आणि सोना बघता बघता तिच्या दुप्पट-चौपट झाली. ती रूपालीला सहज तोंडात उचलून धरी; पण सोनालीचे दात कधी रूपालीला लागले नाहीत. रूपालीने मात्र आपला ताईपणा शेवटपर्यंत सोडला नाही. सोनाली फार वाह्यातपणा करू लागली, की रूपाली गुर्र करून दटावीत असे. मुंबईहून दोघींसाठी गळपट्टे व साखळ्या आणल्या. लहानपणापासून जर त्यांना साखळीची सवय लावली नाही; तर मोठेपणी ही जनावरं साखळी घालू देत नाहीत. घराच्या गच्चीवर सोनालीचं बिऱ्हाड थाटलं. गच्चीवर मी नेहमी दोघींना मोकळं ठेवत असे. पुढे गच्चीवर सोनाली आणि रूपाली मोकळेपणानं खेळू लागल्या, एकमेकींचा पाठलाग करू लागल्या. माझ्या पायांतून पळू लागल्या; पण सिंहकन्या, एक श्वानकन्या आणि एक डॉक्टर कन्या असा हा अवर्णनीय सामना. मला त्या वेळी कोणत्याच गोष्टींचे भान राहत नसे. एक विलक्षण अवर्णनीय आनंद मी लुटत असे, अगदी भरभरून. याच गच्चीवर त्या दोघी पहिल्या पावसाळ्यात नाचल्या होत्या. फारच जोराचा पाऊस आला म्हणजे मात्र सज्जाचा आडोसा त्या घेत. एरवी साऱ्या गच्चीवर पावसात हुंदडत. जळगावला बॅडमिंटन टूर्नामेंटस्‌होत्या. सोनालीला घेऊन मी कोर्टावर गेलो. तिथे माझे मित्र डॉ. आठवले आपल्या अल्सेशियन कुत्र्याला घेऊन आले होते. चांगला उंच व दांडगा कुत्रा होता तो. त्याची व सोनालीची गाठ पडली. आधी त्या कुत्र्याला हे मांजराचं पिल्लू आहे असं वाटलं असावं. तो तिच्या अंगावर धावला. सोनाली त्याच्यापुढे फारच लहान दिसत होती; पण किंचितही न घाबरता ‘‘फिस्‌’’ करून ती त्याच्या अंगावर धावली, मग मात्र तो अल्सेशियन कुत्रा पळू लागला व सोनाली त्याचा पाठलाग करू लागली. कोर्टावरील साऱ्या खेळाडूंना हा प्रकार पाहून मजा वाटली. रूपालीच्यापेक्षा सोनालीची वाढ एकदम झपाट्याने झाली. ती चांगलीच मोठी िदसू लागली. वाढत्या वयाप्रमाणे सोनालीच्या आहारातही मी वाढ केली. आता सोनाली पाच महिन्यांची झाली होती. सोनालीचं जेवण तीनदा होत असे. सकाळी नाश्ता. नाष्ट्यासाठी तिला दूध व अंडी देत होतो. दुपारी जेवताना मी तिला खिमा देत असे. रात्री मात्र सोनाली शुदध्‌ शाकाहारी जेवण घेत असे. दूधपोळी, नाहीतर दूधभाताचं आणि त्यासाठी मग ती आमच्या गंगूबाई स्वयंपाकिणीशी लाडीगोडी लावी. जेवायची वेळ झाली, की ती स्वयंपाकघरात जाई आणि स्वयंपाकीणबाईच्या पायांत घोटाळत राही. त्यांच्याभोवती फिरत राही. तोंडानं लाडिक ‘‘आव आव’’ करत त्यांच्याकडे जेवणाची मागणी करी; पण तिचं जेवण ताटलीत टाकलं, की ती गुरगुरायला लागे. ताटली खाली ठेवली, की ताटलीवर तुटून पडे. जिभेनं ताटली चाटून पुसून साफ करून होईपर्यंत तोंडानं तिची गुरगुर चालूच राही. दूधपोळी नि दूधभात खाणारी जगातली ती एकमेव सिंहीण असावी. तिला व रूपालीला मी मोटारीतून बाहेर फिरायला नेऊ लागलो. दोघींची मोटारीतून बसायची जागाही पक्की ठरलेली. ड्रायव्हरच्या शेजारची सीट ही त्यांची जागा. जाणाऱ्या येणाऱ्यांकडे दोघी खिडकीतून टक लावून पाहत राहत. दोघींचे 68 पुढील पंजे दाराच्या बाहेर ऐटीत टाकलेले असत. बैलगाड्या, टांगे, गुरं यांकडे ही जोडी डोळे विस्फारून पाहत असे. आता सोनाली वर्षाची झाली होती. तिची उंची वाढली होती. अंगात ताकद आली होती. साखळी लावल्यानंतर आम्ही तिला न्यायच्याऐवजी तीच आम्हांला ओढू लागली होती. आता ती पूर्ण आहार घेत असे. रोज साडेतीन किलो मटण तिला लागत असे. रात्री एक लिटर दूध आणि चार पोळ्या आम्ही तिला देत असू. फार आवडीने ती त्या खायची. अर्थात प्रत्येक वेळी तिला बरोबर रूपाली लागत असे. रूपाली नसली तर सोनाली जाळीच्या दरवाजावर पंजे मारत असे. मी तिला माझ्या हातानं खायला देत असे. दवाखान्याच्या कामामुळे मला कधी कुठं जावं लागेल याचा नेम नसे. मग माझ्या अनुपस्थितीत अण्णांकडे किंवा गड्याकडे सोनालीच्या जेवणाची व्यवस्था असे. तशी सवय करणं आवश्यक होतं. अण्णा प्रथम जाळीच्या दरवाजाच्या आत बसून चिमट्याने तिला खाऊ घालत. कधीकधी गच्चीच्या कठड्यात असलेल्या सिमेंटच्या जाळीमधून खाऊ घालत. असं करून त्यांचा विश्वास वाढला आणि स्वत: हातानं तिला खाऊ घालावं असं त्यांनी ठरवलं; पण एकदा त्यांना विचित्र अनुभव आला. त्या दिवशी दवाखान्यात मला काम होतं. सोनालीला जेवू घालण्याचं काम मी अण्णांकडे सोपवलं. जेवणाचा डबा घेऊन अण्णा नेहमीप्रमाणे जाळीच्या दरवाजाजवळ आले. डबा दरवाजाजवळ हॉलमध्ये ठेवून दार उघडून ते गच्चीवर सोनालीकडे गेले. दरवाजा गच्चीकडून त्यांनी बंद केला. गच्चीवर गेल्याबरोबर सोनाली त्यांच्या मागे मागे गेली. तिला वाटलं त्यांनी जेवणाचा डबा आणला आहे; परंतु त्यांच्याजवळ खाणं नाही हे लक्षात येताच सोनाली परत दरवाजाकडे धावत गेली. सोनाली त्यांच्या अंगावर गुरगुरू लागली; पण अण्णांना तिच्या गुरगुरण्याचा अर्थ कळला नाही. तिला उद्द‌ ेशून ते म्हणाले, ‘‘सोना, थांब मी डबा आणतो, बाजूला हो.’’ असं ते दरवाजापाशी जाताच सोनालीने एक मोठी डरकाळी फोडली. सोनालीची डरकाळी साऱ्या बंगल्याच्या आवारात घुमली. काय झालं आहे ते कोणालाच कळेना. मी हातातलं काम टाकून दरवाजाजवळ धावत गेलो. तोच ‘‘शांताराम धाव’’ अशी अण्णांची हाक ऐकू आली. मी प्रत्यक्ष तेथे पोहोचलो तेव्हा अण्णा सोनालीला ‘‘चूप राहा’’ असं सांगत होते. मी पाहिलं, तर सोनालीचा आवेश फारच भयंकर होता. मी घाईघाईनं लोखंडाची पट्टी घालून जाळीचा दरवाजा उघडला व जेवणाचा डबा घेऊन गच्चीवर प्रवेश केला; परंतु नेहमी खाण्यासाठी लाडीगोडी करणारी सोनाली आज इतकी रागावलेली होती, की तिनं उडी मारून माझ्या हातातला डबा पंजाने फटकारा मारून दूर उडवला. मटण गच्चीवर इतस्तत: पसरलं. ती गुरगुर करत त्यावर तुटून पडली. पंधरा-वीस मिनिटांत तिनं सर्व फस्त केलं. खाल्ल्यावर सोनाली शांत झाली आणि येऊन माझे पाय चाटू लागली. जणू काही झाल्या प्रकाराबद्दल ती आमची क्षमाच मागत होती. अण्णांना मी म्हणालो, ‘‘जेवताना पशूंना कोणी फसवलं, त्यांची खोडी काढली अथवा थोडा विलंब जरी लागला तरी ते त्यांना सहन होत नाही.’’ सोनालीच्या दातांत विलक्षण ताकद आली होती. एकदा नेहमीप्रमाणे सोनालीला मी रात्री पितळी पातेल्यामधून दूध प्यायला दिलं. तेवढ्यात कोणीतरी आलं म्हणून मी तसाच उठलो. पातेलं परत न्यायचं विसरलो. इकडे सोनालीने दूध पिऊन झाल्यावर पातेलं चावायला सुरुवात केली. रात्रभर तिची त्या पातेल्याशी मस्ती चालू होती. सकाळी उठल्यावर मी गच्चीवर गेलो. पाहतो तर त्या पितळी पातेल्याची सोनालीने अक्षरश: चाळणी केली होती. वन्यपशूंच्या दातांत केवढी ताकद व चिवटपणा असतो. याचा मला अनुभव आला. सोनालीनं चाळण केलेलं ते पातेलं मी अजूनही जपून ठेवलं आहे. सोनाली आता आमच्या घरच्यापैकी एक झाली होती. सोनालीचा जसा रूपालीवर जीव तसा दीपालीवरही होता. दीपाली सोनालीच्या जाळीपाशी जायची व आपल्या बोबड्या आवाजात ‘‘छोना, छोना तू काय कत्ते?’’ असं म्हणून तासन्‌तास तिच्याशी खेळत असायची. एकदा दोघी अशा खेळत असताना एक पेशंट तिथं आला, त्याला वाटलं पोर चुकून सिंहिणीपाशी आली. त्यानं घाईघाईनं दीपालीला उचललं. त्यासरशी सोनाली मोठ्याने फिसकारली व त्या गृहस्थाच्या 69 अंगावर धावली. तिचं अवसान पाहून त्यानं दीपालीला तेथेच टाकलं. आतल्या बाजूला अण्णा होते. सोनालीचा आवाज एेकून अण्णा स्वयंपाकघरातून बाहेर आले व म्हणाले, ‘‘काय रे, काय झालं?’’ ‘‘दीपा सिंहाच्या तावडीत सापडली आहे,’’ त्यानं अण्णांना सर्व प्रकार सांगितला. ‘‘तू पुन्हा दीपालीला उचल, मी पाहतो.’’ अण्णा म्हणाले. पुन्हा तो गृहस्थ गेला. दीपाली जाळीपाशीच होती. त्यानं पुन्हा दीपालीला हात लावताच सोनाली पुन्हा पहिल्यासारखीच चवताळून या गृहस्थाच्या अंगावर धावली. अण्णांनी मग सोनालीला शांत केलं. दीपाली ही आपल्या घरची आहे आणि ितला कोणी इतरांनी उचलता कामा नये, ही मोठी जाणीव सोनालीला झाली होती. अण्णांनी एका हातात दीपालीला घेतलं व दुसऱ्या हातानं प्रेमळपणे सोनालीला थोपटलं. आम्ही येणार, सोनालीला घेऊन येणार ही बातमी पुण्याच्या पेरपरमध्ये आली होती. आमची वाट पाहत शेकडो पुणेकरांनी आधीच ‘कॅफे गुडलक’च्या चौकात गर्दी केली होती. येणारा जाणारा विचारे, ‘‘काय हो, कोण येणार आहे?’’ मग फूटपाथवरील एखादा तरुण सांगू लागे, ‘‘अहो, मोटारीतून सिंहीण येणार आहे.’’ ‘‘उघड्या मोटारीतून?’’ ‘‘मग, आम्ही काय खोटं सांगतोय काय?’’ पाहता पाहता गर्दी वाढू लागली. सोनाली आली. गर्दीत एकच उत्साहाची लाट आली. प्रत्येकजण सोनालीला पाहण्यासाठी धडपडत होता. मान उंच करून, टाचा वर करून लोक पाहत होते; पण जरा दुरूनच लोकांना पाहण्यासाठी सोनालीला व रूपालीला आवारातच साखळ्यांनी बांधून ठेवलं. दोघींना खूप तहान लागली होती, म्हणून बरोबर आणलेल्या दगडीतून त्यांना पाणी पाजलं. जमलेल्या बघ्यांपैकी कुणी अंडे आणलं, कुणी दूध आणलं होतं. वेळ रात्रीची होती. मी अतिशय थकलो होतो; पण मला झोप येईना. उठल्या उठल्या मी कमिशनरना फोन केला. ‘‘सोनाली आली आहे’’ म्हणून सांगितलं. पेशवे बाग. शेवटचा टप्पा. तिथेही स्त्री-पुरुष, लहान मुलं यांची गर्दी. महापौरांनी सोनालीचा औपचारिक स्वीकार केला. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आता तिला आतल्या पिंजऱ्यात सोडायचं होतं, म्हणून सोनालीच्या गळ्याभोवती असलेला माझा पट्टा व साखळी मी सोडली. माझी सोनालीवरची प्रेमाची मालकी संपली. अण्णा कसेबसे अश्रू आवरून धरत होते. दु:खाचा एकेक कढ आवंढ्याबरोबर मी गिळत होतो. सारेच अधिकारी व प्रेक्षक स्तब्ध होते. काय बोलावं तेच मला समजेना. सोना आतल्या पिंजऱ्यात जायला तयार नव्हती. मी आत गेलो, की ती आतल्या पिंजऱ्यात येई. मी बाहेर आलो, की ती बाहेर येई. आता फसवायचं होतं. फसवूनच तिला आत कोंडणं शक्य होतं, म्हणून रूपालीला मी प्रथम आतल्या पिंजऱ्यात पाठवली. तिच्या पाठोपाठ सोनाली पिंजऱ्यात गेली. मी दरवाजा बंद केला, मग पिंजऱ्याचा दरवाजा थोडासा उघडून रूपालीला बाहेर ओढलं व चटकन दरवाजा लावला. सोनाली एकटीच पिंजऱ्यात राहिली. मुकेपणानं प्रेम करणारी रूपाली पिंजऱ्यासमोर उभी राहून डोळे भरून तिच्याकडे पाहत होती. रूपाली बाहेर, मी बाहेर, अण्णा बाहेर. सोनाली अाळीपाळीने आमच्याकडे पाहत होती. ते गज, ती कडीकुलपं...सोनाली बिथरली. गरगरा फिरू लागली. मोठ्याने ओरडू लागली. पिंजऱ्याबाहेर येण्यासाठी धडपडू लागली. जड अंत:करणाने मी पिंजऱ्याकडे पाठ फिरवली आणि मुकाट्याने गाडीत जाऊन बसलो. 70 कृती (१) आकृत्या पूर्ण करा. (अ) लेखकाने निवडलेल्या पिलाची वैशिष्ट्ये (आ) सोनाली आणि रूपाली यांची झोपण्यापूर्वीची दंगामस्ती (२) तुलना करा. सोनाली रूपाली (३) खालील वाक्यांतून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा. (अ) सोनालीचे दात कधी रूपालीला लागले नाहीत- (आ) रूपाली सोबत नसली तर सोनाली जाळीच्या दारावर पंजे मारी- (इ) सोनालीने एक मोठ्‌ठी डरकाळी फोडली- (ई) सोनाली शांत होऊन लेखकाचे पाय चाटू लागली- (उ) मोठ्ठ्याने फिस्कारून सोनाली गृहस्थाच्या अंगावर आली- (ऊ) सोनाली आळीपाळीने आमच्याकडे पाहत होती- (४) पुढील घटना केव्हा घडल्या ते लिहा. घटना घटना केव्हा घडली (अ) सोनाली अण्णांवर रागावली. (आ) सोनालीने पातेल्याची चाळणी केली. (इ) सोनाली गृहस्थाच्या अंगावर धावली. (ई) सोनाली बिथरली, गरागरा फिरू लागली. (५) सोनाली आणि रूपाली यांच्यातील मैत्री दर्शवणाऱ्या त्यांच्या दोन सवयी लिहा. (६) खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा. (अ) डोळे विस्फारून बघणे- (आ) लळा लागणे- 71 (इ) तुटून पडणे- (ई) तावडीत सापडणे- (७) स्वमत. (अ) सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा. (आ) ‘पशूंना कोणी फसवलं, तर त्यांना राग येतो’, यासंबंधी तुम्ही अनुभवलेली एखादी घटना तुमच्या शब्दांत सांगा. भाषाभ्यास द्‌वंद्‌व समास l खालील वाक्ये वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा. (अ) ती दोघे बहीणभाऊ आहेत. (आ) खरेखोटे समजल्याशिवाय अभिप्राय देऊ नये. (इ) कष्टाची मीठभाकर आयत्या पक्वानापेक्षा गोड लागते. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान असतात, त्याला ‘द्‌वंद्‌व समास’ असे म्हणतात. द्‌वंद्‌व समासाचे एकूण तीन प्रकार आहेत. (१) इतरेतर द्‌वंद‌व् समास (२) वैकल्पिक द्वंद्‌व समास (३) समाहार द्व‌ ंदव्‌ समास (१) इतरेतर द्‌वंद्‌व समास- l खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा. उदा., आईवडील-आई आणि वडील. (अ) नाकडोळे (आ) सुंठसाखर (इ) कृष्णार्जुन (ई) विटीदांडू ज्या समासाचा विग्रह करताना ‘आणि’, ‘व’ या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो, त्या समासाला ‘इतरेतर द्वंद्‌व’ समास म्हणतात. l इतरेतर द्वंद्‌व समासाची वैशिष्ट्ये (अ) अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा असते. (आ) या समासाचा विग्रह करताना ‘आणि’, ‘व’ ही समुच्चयबोधक अव्यये वापरावी लागतात. 72 (२) वैकल्पिक द्‌वंद्‌व समास- l खालील वाक्ये वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा. उदा., बरेवाईट प्रसंग सगळ्यांच्याच जीवनात येतात. बरेवाईट - बरे किंवा वाईट (अ) कुठलीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी सत्यासत्याचा विचार करावा. (आ) सभेला चारपाच माणसेच उपस्थित होती. ज्या समासाचा विग्रह करताना ‘किंवा’, ‘अथवा’, ‘वा’ या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो, त्यास ‘वैकल्पिक द्वंद्‌व समास’ असे म्हणतात. l वैकल्पिक समासाची वैशिष्ट्ये (अ) दोन्ही प्रधान पदांपैकी एकाचीच अपेक्षा असते. (आ) समासाचा विग्रह करताना ‘किंवा’, ‘अथवा’, ‘वा’ यांपैकी एखादे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरावे लागते. (३) समाहार द्‌वंद्‌व समास- उदा., सहलीला जाताना पुरेसे अंथरुण-पांघरुण सोबत घ्यावे. अंथरुण-पांघरुण- अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर कपडे. l खालील वाक्ये वाचा व त्यांतील सामासिक शब्द ओळखा. (अ) कोपऱ्यावरच्या मंडईत भाजीपाला चांगला मिळतो. (आ) गरिबास कपडालत्ता द्यावा, अन्नपाणी द्यावे. ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश केलेला असतो, त्यास ‘समाहार द्वंद्‌व समास’ असे म्हणतात. l समाहार द्वंद‌व् समासाची वैशिष्ट्ये (अ) समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश केलेला असतो. (आ) समासात आलेल्या आणि त्या जातीच्या इतर वस्तूंच्या समुदायाला महत्त्व असते, म्हणून हा समास एकवचनी असतो. l तक्ता पूर्ण करा. सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव पालापाचोळा केरकचरा तीनचार खरेखोटे कुलूपकिल्ली स्त्रीपुरुष ||| 73

Use Quizgecko on...
Browser
Browser